वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच डॉक्टरांना कायद्याचेही ज्ञान आवश्यक   

डॉ. राजेंद्र अनभुले यांचे प्रतिपादन

पुणे : वैद्यकीय व्यवसाय हा सर्वात प्रतिष्ठित व्यवसायांपैकी एक असल्याने  डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करतांना नैतिकता, काळजी, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता व व्यावसायिक कौशल्याबरोबरच वैद्यकीय प्रकरणाशी संबंधित कायदेशीर बाबींचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ डॉ. राजेंद्र अनभुले यांनी केले. 
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक लॉ कॉलेज आणि जयंतराव टिळक व इंदूताई टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ’मेडिको लीगल चॅलेंजेस इन मॉडर्न इंडिया ः बॅलेन्सिंग राइट्स, एथिकस् आणि रिस्पॉन्सिबिलिटी इन इंडिया’ या विषयावर आयोजित एक दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  
 
टिमवि संकुलातील सभागृहात नुकतीच ही परिषद पार पडली. यावेळी दीपप्रज्वलन करून व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, टिमवि ट्रस्ट च्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, प्रमुख वक्ते डॉ. मीनाक्षी पंडित, इंदूताई टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र शेंडे, लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रोहिणी होनप, डॉ. अभय नेवगे उपस्थित होते. डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. 
 
डॉ. राजेंद्र अनभुले म्हणाले, वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम करतांना वैद्यकीय कायदेशीर प्रकरणांमुळे डॉक्टरांना सेवा देतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर हल्ले होत आहेत. राज्यघटनेत वैद्यकीय कायदेशीर प्रकरणाशी संबंधित कोणताही तरतूद नसून घटनेतील कलम २१ अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणार्‍यांच्या जीविताचे व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण दिले आहे. घटनेतील कलम ४७ अंतर्गत राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्याअंतर्गत आरोग्याशी संबंधित प्रत्येक नागरिकाची काळजी घेणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे डॉ. अनभुले यांनी नमूद केले. 
 
डॉ. अनभुले यांनी भाषणात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कायदेशीर प्रकरणांसदर्भात जे निकाल दिले त्यांचा आढावा घेतला. निकालाशी संबंधित विविध विधेयके विधानमंडळ व संसदेत मंजूर केले असल्याचे त्यांनी सागितले. 
 
डॉ. मीनाक्षी पंडित म्हणाल्या, भौतिकोपचार तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देतांना डॉक्टरांकडून सहानुभूती, गोपनीयता आणि रूग्णांचा आदर या तीन बाबींचे पालन होणे गरजेचे आहे. रूग्णांना व्याधीमुक्त व वेदनामुक्त करतांना उपचारासाठी लागणारा कालावधी यांची कल्पना रूग्णांना दिली गेली पाहिजे. रूग्णांना उपचाराशी संबंधित फायदे व तोटे याची माहिती देणे हे वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
 
प्रा. विद्या शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रोहिणी होनप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रीमा मुसळे यांनी वक्त्यांंचा परिचय करून दिला. नमिता भंडारी यांनी आभार मानले. सत्रानंतर विषयाशी संबंधित संशोधन लेख प्राध्यापक, संशोधनकर्ते यांनी सादर केले. परिषदेला विविध विद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधनकर्ते उपस्थित होते.
 

Related Articles